Friday, 6 December 2019

दायित्व सहकाऱ्यांचे


२०१० सालचा प्रसंग आहे. मी संभाजीनगर शहर शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून संघाचे काम करत होतो. हे दायित्व येऊन एकच वर्ष झाले होते. शारीरिक विभाग हा पूर्वीपासूनच आवडीचा राहिलेला विषय. म्हणून शारीरिक विभागाचे काम अधिक उत्साहाने करायचो. मग असेच एकदा शारीरिक विभागात संबंधित असलेला 'निवासी वर्ग' हा विषय शहरातील चारही भागांमध्ये घेण्यासाठी त्याकरिताची नियोजन बैठक ठरवली होती.

'निवासी वर्ग' हे संघ स्थापनेपासून बाल स्वयंसेवकांचे संघाचे प्रशिक्षण करण्याचे ठिकाण राहिलेले आहे. संघस्थानावर ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्याचे शाखेवरील काही नियुक्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात असते. मग ते प्रशिक्षण शारीरिक व बौद्धिक असे दोन्ही प्रकारचे असते. पुढे मग हेच प्रशिक्षित स्वयंसेवक निवासी वर्गातील विषय शाखेवर घेत असतात. अर्थात पुढे सर्व स्वयंसेवकां पर्यंत विषय पोहोचतात. सर्वांचे प्रशिक्षण होत असते. अशी एकंदरीत निवासी वर्गाची रचना असते.

तर अशा प्रकारच्या रचनेकरिता आम्ही शारीरिक विभागातील सदस्यांसोबत बैठकीसाठी जमलो होतो. बैठकीस एक जेष्ठ कार्यकर्ते देखील उपस्थित होते. शारीरिक प्रमुख या नात्याने मी बैठक सुरू केली. सर्वांना म्हणालो, "शहरात चारही भागात आपल्याला निवासी वर्ग घ्यायचे आहेत. त्याची रचना करण्याकरिता आपण जमलो आहोत. तेव्हा प्रत्येकाने सांगावे, आपण कशी कशी रचना करू शकतो."

माझे बोलणे संपते न संपते तोच इतर कुणी बोलायच्या आधी सर्वांना उद्देशून ते जेष्ठ कार्यकर्ते म्हणाले, "पण निवासी वर्गाची आवश्यकता आहे का?"

त्यावर लगेच एक मंडळ सदस्य म्हणाला, "खरंच आहे. काहीच आवश्यकता नाही. आपण शाखेवर सगळ्या गोष्टी घेत असतोच. मग निवासी वर्ग कशाला?"

झालं. माझी काय चूक झाली आहे, ते मला त्या मंडळ सदस्याच्या उत्तराने कळाली. पुढचा सगळा वेळ मग 'निवासी वर्गाची आवश्यकता' या विषयाची चर्चा करण्यात गेला. निवासी वर्गाची रचना काही झालीच नाही.

तेव्हा पहिल्यांदा मला जाणवले, आपण करत असलेल्या कामाची स्पष्टता केवळ आपल्याला असून उपयोगाची नाही किंवा आपण आपल्या सहकाऱ्याला समजावून सांगूनही आपले दायित्व पूर्ण होत नाही.

संघाचे कार्य हे समाजाचे कार्य आहे. तेव्हा 'सहकाऱ्यांनी केले नाही', 'सहकाऱ्यांना समजले नाही' म्हणून आपल्या कार्यविभागाचे कार्य अपुरे आहे, असे म्हणता येत नाही.

तर आपल्या सहकाऱ्याला त्याच्या दायीत्वाची स्पष्टाता असणे, हे देखील एक प्रमुख म्हणुन आपलेच दायित्व असते.


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

No comments:

Post a Comment

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...