Friday, 15 November 2019

कंगवा आणि समाजसेवा


वसमत शहरात बालांची शाखा सुरू झाली होती. एक साप्ताहिक मिलन सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात ही सुरू झाले होते. दोन हजार एक सालची गोष्ट आहे. परंतु एवढ्या धिम्या गतीने काम करून कसे चालेल? असा सातत्याने प्रश्न पडायचा. त्यात एवढा मोठा समाज, त्याला आपण कसे पुरू शकतो? असेही वाटायचे. संघाचे काम अधिक गतीने कसे वाढेल किंवा वाढेल का? असे विचार मनात यायचे.

मग एके दिवशी वसमत शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.चंद्रसेन दिवाण यांना सहज भेटायला गेलो असताना, हा विषय निघाला. त्यावर डॉक्टर म्हणाले, "सगळेच संघात येतील असे नक्कीच होणार नाही. नव्हे तशी संघाची अपेक्षाही नाही. पण सगळेच समाजसेवी असावे, याचा आग्रह संघ नक्कीच करतो. म्हणून संघ समाजसेवेचे काम करतो."

आता मात्र मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. एकीकडे सगळेच संघात येणार नाहीत, हे माहीत आहे. तर दुसरीकडे सगळे समाजसेवी व्हावे, ही अपेक्षा वास्तववादी वाटत नव्हती.

परंतु डॉ.दिवाण यांनी ज्येष्ठ प्रचारक मा.दामुअण्णा दाते यांनी सांगितलेला एक दाखला दिला, तेव्हा पटले.

डॉ.दिवाण म्हणाले, "दामुअण्णा दाते यांनी एका बैठकीत एक कंगव्याचे उदाहरण दिले. दामुअण्णा यांनी हातामध्ये एक कंगवा घेतला व सगळ्यांना उद्देशून म्हणाले, 'बघा हा कंगवा किती आकर्षक आहे. त्यावर नक्षीकाम सुंदर आहे. रंग मोहक आहे. हातात पकडायला एकदम छान आहे. त्यावरून बोटे फिरवली तर छान आवाज येतो.

परंतू... या कंगव्याने भांग पाडता येत नाही.
काही उपयोग आहे का मग या कंगव्याचा?

अगदी असेच व्यक्तीचे देखील आहे. त्या त्या व्यक्तीने आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे. यश, किर्ती, पैसा सर्व काही मिळवलेले आहे.

परंतु ती व्यक्ती समाजसेवी नाही. ती व्यक्ती त्या भांग न पाडता येणाऱ्या कंगव्याप्रमाणेच आहे."

तात्पर्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती निर्माणाचे कार्य शाखेच्या माध्यमातून करतो. मग तेच स्वयंसेवक अगदी प्रेरणेने समाजसेवेचे व्रत स्विकारत असतात.

पण समाज म्हणुन प्रत्येक व्यक्तीने संघटना कोणतीही असो, संस्था कोणतीही असो किंवा माध्यम कोणतीही असो जीवनातील काही भाग समाजकार्याला कोणत्यानाकोणत्या प्रकारे देणे व्यक्तीच्या व समाजाच्या, दोघांच्याही हिताचे आहे.

संदर्भ व संपर्कसूत्र :- डॉ.चंद्रसेन दिवाण - ९४२००८१७५५

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

No comments:

Post a Comment

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...