विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली होती. वसमत शहरातील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचा वादविवाद, वक्तृत्वचा वारसा देखील खुप मोठा होता.
त्यात योगदानाची संधी म्हणून अनेक स्पर्धांमध्ये महाविद्यालया मार्फत परगावी जायला लागलो. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला.
वाचनाचीही आवड होती. त्यावर्षी अटलजींच्या कविता - 'मेरी इक्यावन कविताएँ' हे पुस्तक वाचले. खूप भारावून गेलो. शिवाय त्यांना प्रत्यक्ष पहायलाही मिळाले. अटलजी १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडला सभा घेण्याकरता आले होते. आणि याच निवडणुकीत ते पंतप्रधान देखील झाले.
त्यांचे एकंदरीतच सगळे व्यक्तिमत्व पाहून असे वाटायला लागले होते की, 'आपणही देशासाठी कार्य करावे. अगदी त्यांच्या प्रमाणे. आणि देशाचे पंतप्रधान देखील व्हावे'.
स्वप्नच ते. मग पाहायला काय हरकत आहे!
म्हणून मग पुढे वसमत शहरातील काही भाजपच्या वॉर्डांच्या बैठका किंवा एखाद्या भाजपच्या शाखेच्या उद्घाटन समारंभाला जायला लागलो. काही वेळेला सूत्रसंचालन देखील केले. एकंदरीतच खूप छान वाटत होते.
आणि हो. संघ शाखेतही अगदी नियमित होतो. सिद्धेश्वर सायं शाखेचा कार्यवाह म्हणून दायित्व होते. शाखा नियमित सुरू होती. त्यात खंड पडणे शक्यच नव्हते. कारण प्रेरणास्थान अटलजी. ते आधी स्वयंसेवक होते. नंतर प्रचारक झाले. आणि शेवटी भारताचे पंतप्रधान देखील झाले. कदाचित म्हणूनच.
पुढे संघ शिक्षा वर्ग प्रथमवर्षाकरिता (२००० साली) पुण्याजवळील निगडी प्राधिकरणात जाणे झाले. प्राथमिक वर्ग होऊन खूप दिवस झाले होते. शिवाय तेव्हा बालही होतो. आता मात्र ऐन तारुण्यात देशभक्तीचे स्फुरण चढले होते. मी 'पंतप्रधान होण्याचे स्वप्न' माझ्या वहीत लिहून ठेवले होते.
परंतु 'संघ संस्कार' काही वेगळा व्हायचा होता.
त्यावर्षी अटलजींच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. सबंध देशभरात त्याची खूप मोठी चर्चा देखील सुरु होती. स्वाभाविकच प्रथम वर्षात देखील सगळ्या स्वयंसेवकांत ही चर्चा सुरु होती. 'आता भारताचे काय होणार? एवढ्या वर्षानंतर असे वेगळे व्यक्तिमत्व असलेले पंतप्रधान लाभले आहेत. त्यांना नाही चालता आले तर? त्यांना काही झाले तर...?'
अशी एकंदरीत सुरू असलेली ही चर्चा आणि काळजी ही बहुतेक वर्गात बौद्धिका करीता आलेल्या ज्येष्ठ कार्यकर्ते मा.मधुभाई कुलकर्णी (त्यावेळेस अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख) यांनी ऐकली असावी. ज्याचा समाचार त्यांनी बौद्धिकात घेतला.
आणि माझा दृष्टिकोन अगदी निर्मळ पाण्याप्रमाणे स्पष्ट झाला. 'मी' पासूनचा माझा प्रवास 'आम्ही' पर्यंत मधुभाईंनी नेऊन ठेवला. पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाचा विचार तर मी सोडून दिलाच. आणि आजीवन स्वयंसेवक राहून संघ सांगेल ते कार्य करण्याचा संकल्प केला.
कारण मधुभाई बौद्धिकात म्हणाले, "काळजी करू नका. अटलजींना काही होणार नाही. आणि काही झालेच तरी संघाकडे असे अजून शंभर 'अटलजी' आहेत..."
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९