संभाजीनगर शहराच्या मासिक जिल्हा बैठकीचा समारोप विभाग प्रचारक श्री समीरजी क्षीरसागर यांनी करण्यास सुरुवात केली, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. म्हणाले, "मी एकटाच बोलणार नाही तर आपण सगळ्यांनीही आपले मत, विचार किंवा अनुभव एका वाक्यात मांडायचे आहे. आणि तो विषय म्हणजे 'आपला प्रवास' आणि शेवटी मी देखील माझा अनुभव एका वाक्यात मांडतो."
मग प्रत्येक जिल्हा कार्यकर्त्यांनी क्रमाने बोलायला सुरुवात केली.
'पूर्वनियोजित प्रवास', 'कार्यासाठीचा प्रवास', 'कार्यकर्त्यासाठीचा प्रवास', 'कार्यक्रमासाठीचा प्रवास', 'निवासी प्रवास', 'अन्य कार्य विभागासाठीचा प्रवास', 'उपक्रमाचा पाठपुरावा घेण्यासाठीचा प्रवास', असे वेगवेगळे चिंतन व अनुभवातून प्रत्येकाने आपले विचार मांडले.
आणि शेवटी समीरजी म्हणाले, "प्रवास स्वतःसाठी देखील असतो."
आणि बैठक संपली. स्वाभाविकच प्रत्येकजण आत्ममग्न झाला होता.
त्यानंतर बराच कालावधी उलटून गेला.
काही महिन्यांपूर्वी प्रांताच्या योजनेतून ठरलेल्या उपक्रमा अंतर्गत 'तालुका व्यापक बैठक' घेण्याकरिता परभणी जिल्ह्यात पुर्णेला जाणे झाले. बैठकीची पूर्वतयारी म्हणूनही प्रवास झाला. सगळी रचना झाली. आणि प्रत्यक्ष बैठकीच्या दिवशी मुक्कामी देखील गेलो.
सगळे सत्र ठरल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित पार पडले. अपेक्षित ती संख्यादेखील होती. आणि बैठक संपवून पुढच्या गाडीने संभाजीनगरला निघायचे होते. तर शहर कार्यवाह श्री हर्षल महाजन यांनी डबा नेण्याचा आग्रह केला. तसे पाहता दुपारी अडीच पर्यंत घरी पोहोचणार होतो. आणि न्याहारी देखील पोटभरून झाली होती. पण त्यांच्या आग्रहासमोर 'नाही' म्हणू शकलो नाही.
आणि त्यांनी डबा आणून दिला.
इथपर्यंत सगळे ठीक चालले होते पण हर्षलजींनी सोबत पाण्याची बाटली देखील दिली.
गोष्ट खूप साधी होती. पण मी पाहतच राहिलो. आजच्या धावत्या युगात 'पाणी काय कुठेही विकत घेता येते', असा आपला नेहमीच विचार असतो.
पण 'जेवताना ऐनवेळेला तहान लागल्यास काय?', कदाचित या भावनेने घरातील माऊलीने पाण्याची बाटली देखील दिली होती.
खरंतर त्या नुसत्या पाण्यानेच माझी भूक भागली होती. अगदी भारावलेल्या वातावरणात प्रवास झाला.
घरी आल्यानंतर आई-बाबा आणि पत्नीला हा प्रसंग सांगितला. आणि म्हणालो, "अशी कार्यकर्त्यांची काळजी घेणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या घरातील माऊली असतात म्हणून आम्ही संघ काम करतो."
आणि मनातल्या मनात म्हणालो, "हा प्रवास स्वतःसाठीचा होता."
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
No comments:
Post a Comment