Friday, 15 November 2019

मंगळवार आणि हेडगेवार


पहिल्यांदाच गाव सोडून परप्रांतात नोकरीनिमित्त जाण्याचा योग आला, तो सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रात. 2004 साल होते. आजपर्यंत संघाच्या संपर्कात वाढलो होतो. पण पहिल्यांदाच विश्व हिंदू परिषदेचा संबंध आला. तो माझा बालमित्र व विहिंपचा सातारा जिल्हा प्रचारक श्री अविनाश कुलकर्णी याच्यामुळे. शाळेनंतर प्रथमच जवळजवळ एक वर्ष सोबत रहायला मिळाले.

मग श्री बाबूजी नाटेकर, प.महा.विहिंप, प्रांत मंत्री यांचा परिचय झाला. नंतर काही वेळा भेटीही झाल्या.

आणि एकदा एका बैठकीचा निरोप मिळाला. श्री मिलींदजी परांडे, विहिंप केंद्रीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक मंगळवारी होती. बैठकीनंतर नाष्टया होता.
आणि मी मंगळवार कुलदेवतेचा दिवस म्हणून उपवास करायचो. आणि काही केल्या उपवास मोडायचा नाही, हा माझा संकल्प होता.

मला एक प्रकारे संकोच वाटला की, आता बैठकीला कसे जायचे? बाबूजींच्या घरीच बैठक होती. बैठकीनंतर नाष्टयाची व्यवस्थाही केली होती. आपल्यालाही नाष्टया करावे लागेल! संघ कार्य करत असताना, स्वयंसेवकाच्या घरी मिळेल ते खावे, आपल्याला केवळ 'हेडगेवार' असला पाहिजे. अशा समजूतीमध्ये मी होतो. अर्थात ही माझी धारणा होती. त्यामुळे मी मंगळवार सोडून संपर्क जायचो.

पण मग बैठकीलाही जायचे की नाही? हा माझ्या समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. कारण श्री मिलिंदजी परांडे यांचे वसमतला राष्ट्र जागरण अभियानामध्ये बौद्धिक ऐकायला मिळाले होते. खूप आवडले होते. म्हणून परत त्यांचा सहवास अनुभवण्याचा क्षण मला सोडायचा नव्हता.

मग योगायोगाने बाबूजींची भेट झाली. आणि न राहून माझी अडचण मी त्यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता बाबूजी म्हणाले, "अरे संघाचे काय किंवा विहिंपचे काय, काम हे भक्तीचेच आहे. त्यामुळे तू तुझा उपवास मोडू नकोस, तू फक्त ये."

मी माझ्या मनाची तयारी करून गेलो. कारण बाबूजी म्हणाले होते, म्हणून. मग बैठक झाली. अर्थातच मिलींदजींनी मांडलेला विषय खूपच सुंदर होता. 
सगळ्यांचा परिचय झाला. मग सगळे नाष्टयासाठी बसले. आणि केवळ मला उपवासाचा फराळ देण्यात आला. उर्वरित सगळे कार्यकर्ते नाष्टया करायला लागले. मी मात्र आश्चर्यचकित झालो होतो. डोळ्यात पाणी यायचेच शिल्लक होते. माझ्याकडे काहीही जबाबदारी नव्हती. केवळ काही दिवसांचा परिचय होता. पण एका प्रांत मंत्र्यांनी अगदीच सामान्य स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या आस्थेची घेतलेली ही सर्वोच्च काळजी होती. जी मी प्रत्यक्ष अनुभवली. अन्यथा बैठकीचा व्याप, केंद्रीय कार्यकर्त्यांचा प्रवास, बैठकीचे विषय, स्वत:च्याच घरच्या बैठकीची व्यवस्थेची तयारी, अशा कितीतरी गोष्टी होत्या. पण अगदी लक्षपूर्वक उपवासाच्या फराळाची त्यांनी व्यवस्था केली होती.

उद्देश एकच केवळ 'उपवास मोडला नाही पाहिजे' असेच नाही तर 'हेडगेवार' करत असताना 'मंगळवार' मोडल्या जात नाही, याचा अनुभव द्यायचा होता.

उपवासाने जेवढे पुण्य मिळेल असे वाटले होते, तेवढाच आनंद आणि धन्यता बाबुजींसारख्या देवदुर्लभ ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासाने आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मिळाली.

आणि पहिल्यांदा अनुभवले, ऐकले होतेच संघकार्य ईश्वरी कार्य आहे ते बाबूजीं सारख्या कार्यकर्त्यांमुळेच...

संदर्भ व संपर्क सूत्र - श्री बाबूजी नाटेकर - ९८५००४३०२९


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

No comments:

Post a Comment

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...