२००० सालचे जिल्ह्याचे हेमंत शिबिर हिंगोली येथे सुरू होते. मी शिबिराचा मुख्य शिक्षक होतो.
माझी वसमत येथील शाखा सुरू होऊन एकच वर्ष होत होते. जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकर्त्यांचा छान परिचय झाला होता.
पण शिबिरप्रमुख या जबाबदारीचं नाही म्हटलं तरी दडपण होतंच.
पहिलाच अनुभव होता आणि त्यात पहिल्याच दिवशी निरोप मिळाला की, समारोपाला मा.प्रांत संघचालक-अण्णा गोसावी येणार आहेत.
आता अजूनच दडपण वाढले. कारण तोपर्यंत विभाग, प्रांत कार्यकर्त्यांचा परिचय किंवा थेट भेट झालेली नव्हती.
आणि बाहेरच्या जगाप्रमाणे आपली काय काय चौकशी होईल, याची काळजी अधिक लागली होती.
समारोपाचा दिवस उजाडला. दुपारच्या भोजनाची वेळ झाली होती, मी ही जेवायला बसलो होतो.
निरोप मिळाला अण्णा आले आहेत. तसाच उठून बाहेर संघस्थानावर गेलो. शिट्टी संकेत दिला.
त्यांनंतर मा.शिबिर अधिकारी अण्णांना घेऊन आले. त्यांच्या भोजनानंतर परिचय झाला.
पण वाटलेल्या भितीप्रमाणे काहीही घडले नाही. उलटपक्षी परिचयानंतर अण्णांनी वैयक्तिक चौकशी केली.
ज्यामुळे आधार अधिक वाटला. जबाबदारी हलके झाल्यासारखे वाटले.
आणि पुढील समारोप आयुष्यभरासाठी दिशादर्शक ठरला.
अण्णा समारोपात म्हणाले, “संघाच्या शाखेत येण्यापूर्वी किंवा शिबिराच्या माध्यमातून जे संघात पहिल्यांदा आले आहेत,
अशा सगळ्यांनाच, तुम्हाला आजवर समाजात ‘मुलं’ म्हणून संबोधलं जात असेल . कदाचित कुणी ‘पोरं’ असेही म्हणत असतील,
हाक मारत असतील. पण संघात आल्यावर तुम्हा सगळ्यांना एक नवीन ओळख मिळाली आहे.
तुम्ही आता मुलं राहिलेली नाही आहात तर ‘स्वयंसेवक’ झाले आहात.”
२००० ते आजवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
शाखा कार्यवाह ते जिल्हा सहकार्यवाह अशा अनेक स्तरावर काम करायला मिळालं, आनंद मिळाला, शिकायला मिळाले.
पण अण्णांनी ‘स्वयंसेवक’ म्हणून करून दिलेली ओळख आजही अधिक स्पष्ट आहे.
आणि ज्या ज्या वेळेस प्रसंग आठवतो, त्या त्या वेळेस ‘स्वयंसेवक’ असण्याचा आनंद अधिक अधिक होत जातो. . .
©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९
Nice👌👌
ReplyDeleteBest 👌👌👌
ReplyDeleteBest 👌👌👌
ReplyDelete