Friday, 15 November 2019

संघ शिक्षा वर्ग एक साधना

संघ शिक्षा वर्ग एक साधना

साधनेचे तीन प्रसंग

व्रतस्थ व्यक्तीला साधना पूर्ण करत असताना अनेक दिव्यातून जावं लागतं. स्वीकारलेलं व्रत हे पूर्ण जाणिवेतून झालेला निर्णय असतो. मग अशा वेळी कोणतीही अडचण ही साधनेत बाधा आणूच शकत नाही तर ती साधना अधिक सक्षम आणि परिपूर्ण करण्यासाठी येत असते.

असेच संघ शिक्षा वर्ग या रा.स्व.संघाच्या प्रशिक्षण वर्गात स्वयंसेवकांनी केलेल्या साधनेचे देखील असेच आहे.

अशाच काही स्वयंसेवकांचे प्रेरक अनुभव.

श्री रविजी देशपांडे (९९८७५३९०८५), देवगिरी प्रांताचे पहिले शारिरीक शिक्षण प्रमुख व वर्तमान रा. स्व. संघ जनकल्याण समिती, देवगिरी संभागाचे कोषाध्यक्ष यांनी सांगितलेले दोन अनुभव.


साधनेचा पहिला प्रसंग

१९६९ चा संघ शिक्षा वर्ग - प्रथम वर्ष पुणे येथे सुरू होते.
परभणी जिल्ह्यातून काही स्वयंसेवक वर्गात उपस्थित होते.
त्यापैकी एका स्वयंसेवकाला, सेलू या गावातील दर दोन-तीन दिवसांनी मनिऑर्डर येत होती.
स्वाभाविकच सगळ्यांना याचे आश्चर्य वाटत होते. मग त्यावेळेचे परभणी जिल्हा प्रचारक श्री जनुभाऊ रानडे यांनी सांगितले,
या स्वयंसेवकाचा सेलू येथे खेळाचा गाडा आहे. आणि तो त्याने त्याच्या मित्राला चालवायला दिला आहे. रोजच्या विक्रीतून होणारा नफा दोघेजण वाटून घेतात. 
आणि या स्वयंसेवकाच्या वाट्यातील नफा, तो मित्र मनिऑर्डर करून पाठवतो. परिस्थिती इतकी नाजूक आहे की, वर्गाचे शुल्क देखील याच टप्प्याटप्प्याने भरले जात आहे...
----------


साधनेचा दुसरा प्रसंग

१९९२ चे संघ शिक्षा वर्ग द्वितीय वर्ष पुणे येथे सुरू होते. आणि एके दिवशी पू. सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांचा वर्गात प्रवास होता.
आणि त्या दिवशी रात्रीच्या कार्यक्रमात बाळासाहेबांसोबत व्यासपीठावर एका ज्येष्ठ स्वयंसेवकाला आमंत्रित करण्यात आले.
ते होते श्री भाऊराव बेलवलकर.
तो दिवस संघजीवनातील अभूतपूर्व दिवस होता.
तो दिवस एका अर्थाने भाऊरावांच्या कर्तव्याचा आणि कर्तृत्वाचा सोहळा साजरा करणारा होता.
कारण त्याला उपस्थिती देखील प्रत्यक्ष सरसंघचालकांची लाभली होती.
आणि या प्रसंगाचे विशेष कारण होते.
ते म्हणजे, भाऊरावांनी एका गृहस्थाश्रमी, पोष्टात लिपिक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी, गेली पन्नास वर्ष सतत संघ शिक्षा वर्गात शिक्षक म्हणून उपस्थिती ठेवली होती.
वर्षात नोकरीमध्ये मिळणारी रजा ते संघशिक्षा वर्गासाठी वाचवून ठेवायचे. कौटुंबिक व व्यवसायिक किती अडचणी आल्या असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी.
आणि असे करत भाऊरावांनी त्यांच्या साधनेची ५० वर्षे पूर्ण केली होती.
---------- 


साधनेचा तिसरा प्रसंग

माझे विज्ञान शाखेचे पदवीचे तिसरे वर्ष व संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष एकामागे एक, असे पूर्ण झाले. २००२ साल होते. 
हिंगोली जिल्ह्यातून तृतीय वर्षासाठी हिंगोली जिल्हा म्हणून पहिला स्वयंसेवक म्हणून मी उपस्थित होतो. तृतीय वर्षात येऊन संघाचे विराटरूप पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद होताच.

बाबांनी वर्गाला जाताना सांगून ठेवले होते की, रोज नव्या स्वयंसेवकाजवळ जेवायला बसायचे. त्यानिमित्ताने अन्य प्रांतातील स्वयंसेवकांचा परिचय तर होईलच पण कार्याची माहिती देखील मिळेल.

आणि असेच एका दिवशी दुपारच्या भोजनासाठी एका ज्येष्ठ स्वयंसेवका शेजारी बसलो. परिचय झाला.
ते दिल्ली येथील व्यापारी होते. आणि एका भागाचे भाग कार्यवाह असे त्यांच्याकडे दायित्व होते.

व्यावसायिक, कौटुंबिक चौकशीनंतर मी त्यांना म्हणालो, “आपले द्वितीय वर्ष कधी झाले?”
“बारा वर्षांपूर्वी”, असे त्यांनी उत्तर दिले.
मी अंदाज घेवून म्हणालो, “स्वभाविकच, व्यवसायातून सुट्टी काढायला जमले नसेल ना!”
त्यावर स्मित हास्य करत ते म्हणाले, “गेली बारा वर्षे झाले, मी तृतीय वर्षात येण्याची परवानगी काढतो आहे.
पण प्रत्येक वेळेस मला सांगितले जायचे की, अजून एक वर्ष दायित्वाचा अनुभव घ्या आणि मग पुढच्या वर्षी तृतीय वर्षात जा.”



या वाक्यानंतर मात्र मी काहीही बोलू शकलो नाही. त्यांच्या साधनेच्या बारा वर्षांसमोर नतमस्तक होऊन, भोजन आटपून निघालो...


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

No comments:

Post a Comment

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...